बीड दि.२ – मागच्या पंचवीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे दूरदर्शन केंद्र सुरू करण्यात आले.परंतु सदरील केंद्र 31 ऑक्टोबर पासून बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र सदरील ठिकाणी एफएम केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथे मागच्या पंचवीस वर्षांपासून दूरदर्शन केंद्र सुरू आहे. पूर्वी तुरळक ठिकाणी प्रक्षेपण केंद्र असल्याने या भागातील नागरिकांना दूरदर्शन पाहण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने सदरील केंद्राची उभारणी करण्यात आली होती.
परळी, अंबाजोगाई सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक आणि भौगोलिक दृष्टया मराठवाडयातील दोन महत्वाची शहरे आहेत. येथील स्थानिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा व त्यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे. म्हणून अंबाजोगाई येथे आकाशवाणीचे एफ एम (आकाशवाणी) केंद्र सुरु करावे ही जनतेची बऱ्याच दिवसांपासून मागणी आहे. सदरील ठिकाणी सुमारे पाच एक्कर परिसरात दूरदर्शन केंद्राची उभारणी असून कार्यालयासह कार्यरत 20 कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 20 निवासस्थाने आहेत. बीड जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारे केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते.परंतु सोशेल मीडिया आणि इतर खाजगी वाहिन्यांच्या स्पर्धेत दूरदर्शन चा प्रेक्षक वर्ग दिवसेंदिवस कमी झालेला आहे.त्यामुळे केंद्रसरकारने देशातील बहुतांश दूरदर्शन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला त्यात अंबाजोगाई केंद्राचाही समावेस आहे.
परंतु परळी, अंबाजोगाई, लातूर, गंगाखेड, अहमदपुर, धारूर, केज या भागात इलर एफ एम केंद्राचे प्रसारण स्पष्ट ऐकू येत नाही म्हणून अंबाजोगाई येथे आकाशवाणी केंद्र सुरु करणे अत्यावशक आहे. अंबाजोगाई येथे एफ एम केंद्र सुरु झाल्यास आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणारे मा. पंतप्रधान यांचे मन की बात हा कार्यक्रम बीड, लातूर, परभणी जिल्हातील बऱ्याच भागातील तसेच नांदेड व उस्मानाबाद जिल्हाच्या काही भागातील सुमारे तीस लाख जनतेला ऐकता येईल. अंबाजोगाई येथील दूरदर्शन केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन एफ एम केंद्र (आकाशवाणी) सुरु करणे सहज शक्य आहे.
दरम्यान सदरील केंद्र बंद झाल्यानंतर त्याठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी दूरदर्शन केंद्राच्या प्रवेशद्वारावर परळी येथील कांही नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.