केज दि.२ – मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्याने होत्याचं नव्हतं झालं आणि सारं काही पुराच्या पाण्यात वाहून गेलं. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला आणि विशेषत: केज अंबेजोगाई तालुक्याला बसला. धनेगाव धरणाचे 18 दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आल्याने सर्व प्रकारच्या नद्या-नाल्यातील तुडुंब भरून वाहिल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अनेक गोरगरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेला पंचनामा ही करता येत नाही, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली असताना आमदार, खासदार मंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी नुसता दौरा करून पाहणी करण्यापेक्षा तात्काळ मदत मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज अंबेजोगाई तालुक्याला जाहीर करून प्रत्येकी पन्नास हजार रुपये ची आर्थिक मदत शासन स्तरावर द्यावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी बहुजन रयत परिषद चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन रयत परिषद चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पत्रकारांशी बोलताना केली.