Site icon सक्रिय न्यूज

सोमवारपासून शहरी भागासह गजबजणार शाळा……!

सोमवारपासून शहरी भागासह गजबजणार शाळा……!

पुणे दि.२ – मागच्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे वेळापत्रक आणि सवयी कोलमडल्या आहेत.त्यामुळे मुलांना सुरुवातीलाच अभ्यास, परीक्षा हा विचार न ठेवता त्यांना भावनिक आधार देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे किमान एक दोन आठवडे मुलांशी मुक्त संवाद साधावा. मुलांना मन मोकळे करू द्यावे, मित्रांशी संवाद साधू द्यावा. त्यासाठी शिक्षकांना मुलांचे समुपदेशक, हितचिंतक, मित्र व्हावे लागेल, असे मार्गदर्शन राज्य शासनाच्या वैद्यकीय कृती गटाचे सदस्य आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. समीर दलवाई यांनी शुक्रवारी केले.

                  राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) झालेल्या शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शन सत्रात डॉ. दलवाई बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. दलवाई म्हणाले, की करोना काळात मुलांमध्ये बदल झाला आहे. प्रत्येक मूल वेगळ्या परिस्थितीतून आलेले असल्याने शिक्षकांनी पुढील काही महिने प्रत्येक मुलाकडे स्वतंत्रपणे लक्ष द्यायला हवे. मुलांना भावनिक आधाराची गरज आहे. मुलांना खरोखरच आनंद वाटेल असे वातावरण शाळेत असायला हवे.कोरोना काळ शिक्षणासाठी आमूलाग्र बदलाचा ठरला. आता शाळा सुरू करण्याबाबत घ्यायच्या काळजीसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व घटकांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

शिक्षकांनी पालकांमधील भीती कमी करण्यासाठी त्यांचे प्रबोधन केले पाहिजे. प्रतिबंधात्मक उपायांची अंमबजावणी करून मुलांना शाळेत पाठवणे शक्य आहे. शहरी भागातील मुलांना मोबाइल स्क्रीनची सवय झालेली असल्याने शिक्षकांनी मुलांशी संयमाने वागून मुलांशी संवादाचे वेगवेगळे मार्ग शोधावे. पहिली ते चौथीच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेण्याची गरज आहे, असे हेमांगी जोशी यांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर अप्रिय प्रसंग घडू शकण्याची जाणीव ठेवूनच शाळा सुरू कराव्या लागतील. कोरोना काळात शिक्षकांनी नेटाने अध्यापनाचे अनेक प्रयोग केले असले, तरी प्रत्यक्ष शाळांना पर्याय नसल्याचेअधोरेिखत झाले. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शाळेची सर्वाधिक गरज असल्याने किमान दिवाळीनंतर तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यायलाच हवा, असे डॉ. वसंत काळपांडे यांनी नमूद के ले.

दरम्यान, शाळा सुरू होत असताना पालक, शिक्षकांनी पूर्वतयारी करायला हवी. शाळा नसल्याने मुलांचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. तर शिक्षकांनी लगेच अभ्यास, परीक्षेची घाई न करता मुलांना शाळेत रमण्यास वेळ द्यावा. मुलांना लगेचच ज्ञान देण्याची गरज नाही. मुले शाळेत येऊन रमली, की अभ्यासाचा विचार करायला हरकत नाही.

शेअर करा
Exit mobile version