केज दि.९ – तालुक्यातील नायगांव येथील भूमिपुत्र युवा पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मुजमुले यांना साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्थेचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे “राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” जाहीर झाला असून त्यासंदर्भात दि.७ आँक्टोबर २०२१ रोजी त्यांना निवडीबाबतचे निवडपत्र संस्थेच्या अध्यक्षा उषा गायकवाड व संयोजक तथा सचिव सुमंत गायकवाड यांनी पाठविले आहे.
पत्रकार दत्तात्रय मुजमुले हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षापासून शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे.त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी शाळेचे शिक्षण मिळावे म्हणून जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रास सुरवात केली. त्याचबरोबर साक्षर भारत अभियाना अंतर्गत निरक्षराना साक्षरतेचे धडे देण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे.सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत.विविध सामाजिक उपक्रम राबवणे,सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी मदत करणे, वंचित, गरीब, पीडितांच्या प्रश्नाला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम ते प्रामुख्याने करत असतात.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत.त्याचबरोबर एन.जी.ओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस म्हणून ते महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना मदत करण्याचे काम करत आहेत.
त्याचबरोबर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात देखील आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे.सध्या ते पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष असून एका वृत्तपत्राचे ते काम करतात तर एका चॅनल चे मराठवाडा विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
या सर्व बाबींची नोंद घेवून साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानव विकास संस्था माजलगाव,जि.बीड या संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक २०१९ – २० प्रकाशन सोहळा व जयंती निमित्त राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कारासाठी संस्थेच्या निवड समितीने त्यांची निवड केली आहे.पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक,राजकीय तसेच पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.