Site icon सक्रिय न्यूज

परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला…..!

परतीच्या पावसाचा मुहूर्त ठरला…..!

पुणे दि.११ – अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे, मात्र त्यानंतर पाऊस विश्रांती घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.नैर्ऋत्य मोसमी वारे राज्यातून परतण्यासाठी अनुकूल स्थिती असून, दोन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागातून मोसमी वारे परततील, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

                    अरबी समुद्रातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस हजेरी लावत आहे. काही भागांत विजा कोसळण्याचेही प्रकार झाले. सध्या विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. या भागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या दोन्ही विभागांमध्ये हवामान कोरडे होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचे सावट कायम राहणार आहे. काही भागांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांनंतर मात्र या विभागांतही पाऊस विश्रांती घेणार आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा सध्या देशातील परतीचा प्रवास सुरू आहे.

दरम्यान,  हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पुढील एक ते दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यांत ११ ऑक्टोबरपर्यंत, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत ११ आणि १२ ऑक्टोबरला काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा
Exit mobile version