Site icon सक्रिय न्यूज

‘त्यांच्या’ बोलण्याने मी लहान किंवा मोठी होत नाही……!

‘त्यांच्या’ बोलण्याने मी लहान किंवा मोठी होत नाही……!

मुंबई दि.१७ – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भगवान गडावर नुकताच दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी पत्रकार पारिषदेत प्रश्न विचारला असता पवारांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं. तसेच त्यांच्या वक्तव्यावर मी बोलावं एवढया त्या मोठ्या नेत्या नसल्याचं म्हटलं.

यानंतर आज पंकजा मुंडे दिल्लीला एका बैठकीसाठी निघाल्या असता मुंबई विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांना शरद पवारांच्या वक्तव्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांच्या बोलण्याने आपण लहान किंवा मोठे होत नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी पवार साहेबांचं वक्तव्य मोबाईलवर पाहिलं. मी मोठी नेता नाही, हे त्यांचं वक्तव्य बरोबर आहे. मी एक लहानच नेता आहे. परंतु मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोललं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना शिकवलं पाहिजे.

दरम्यान, पवार साहेब मला असं म्हणाले असतील तर मी त्यांच्या बोलण्याने लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. मी आहे तेवढीच राहणार आहे. पवारसाहेब आमच्यापेक्षा नक्कीच मोठे आहेत त्यात काही वाद नाही, असं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version