अंबाजोगाई दि.२१ – विहीरीच्या बाजूला असलेल्या शेतात शेतकरी दोन बैल जुंपून औताने शेतीची मशागत करीत होता. यावेळी समोर अचानक शेळ्या-मेंढ्याचा कळप आला. या कळपाला बैल बुजून उधळल्याने शेजारी असलेल्या विहिरीत औतासह पडले, यात दोन्ही बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पुस येथे गुरुवारी (दि. २१) घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील शेतकरी पांडुरंग नामदेव अकाते हे आपल्या विहीरीच्या बाजूला असलेल्या शेतात औताला बैल जुंपून मशागत करत होते. यावेळी समोरून अचानक शेळ्या-मेंढ्यांचा कळप आल्याने बैल घाबरून उधळले. औतासह उधळलेली बैल जोडी बाजूच्या विहिरीत जावून पडली. यात दोन्ही बैलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा तलाठी सुवर्णा खाडप यांनी केला. बैलजोडी चा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.