Site icon सक्रिय न्यूज

चोरांचा पाठलाग केला मात्र चोरटे पसार……!

चोरांचा पाठलाग केला मात्र चोरटे पसार……!
केज दि.२३ –  मळणी करून आणलेल्या सोयाबीनचे कट्टे घरासमोर जीपमध्ये भरून नेत असताना झोपेतून जागे झालेल्या शेतकऱ्याने इतरांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग केला. शेवटी चोरटे जीप आणि सोयाबीन कट्टे सोडून पसार झाल्याची घटना केज तालुक्यातील सांगवी येथे घडली. याप्रकरणी सात चोरट्यांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      सांगवी ( सा. ) येथून जवळच असलेल्या दराडे वस्तीवरील शेतकरी मसुदेव बपाजी दराडे यांनी शेतातील सोयाबीन पिकाची मळणी करून सोयाबीनने भरलेले ४८ कट्टे घरी आणून घरासमोर हे कट्टे थपी लावून ठेवले होते. २२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास चोरटे हे त्यांच्या घरासमोर बुलोरो पिकअप घेऊन आले. चोरट्यांनी १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोयाबीनचे ४८ कट्टे जीपमध्ये भरून घेऊन जाण्याच्या तयारीत असताना शेतकरी मसुदेव दराडे हे झोपेतून झाले. त्यांनी सोयाबीन कट्टे भरीत असलेल्या चोरट्यांना ओळखले. त्यांनी आरडाओरडा करताच चोरट्यांनी सोयाबीन कट्टे भरलेली जीप निघून जात असताना दराडे व इतर नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र चोरट्यांनी जीपमधून त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. यामध्ये पाठलाग करणारे शेतकरी जखमी झाले. परंतु त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. राजेगाव पाण्याची टाकी मार्गे दैठणा, भोगजी ( ता. कळंब ) चौफळ्यापर्यंत त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केल्याने शेवटी चोरटे हे तेथेच जीप व सोयाबीन कट्टे सोडून अंधारात पसार झाले. २ लाख ५० हजार रुपये किंमतीची जीप ताब्यात घेतली असून चोरून नेत असलेले १ लाख ८० हजार किंमतीचे सोयाबीन कट्टे शेतकऱ्यास परत मिळाले आहेत.
          दरम्यान, शेतकरी मसुदेव दराडे यांच्या फिर्यादीवरून कालीदास मधुकर शिंदे, सुंदर मधुकर शिंदे, सुनिल मधुकर शिंदे ( रा. पिंपळगाव ता. केज ) व इतर अनोळखी चार जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. प्रशिक्षणार्थी फौजदार प्रमोद यादव हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version