मुंबई दि.24 – मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे. लवकरच एसटी महामंडळ देखील आपल्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात अचानक एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले. त्यामुळे महामंडळाला आज अखेर तब्बल 12 हजार 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. दुसरीकडे टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळातील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार तिकिटांच्या दरात तब्बल 17 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव 4 महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाकडे देण्यात आला होता. मात्र त्यावेळी हा प्रस्ताव स्विकारण्यात आला नव्हता. आता मात्र हा प्रस्ताव एसटी महामंडळाचे चेअरमन अनिल परब यांच्या सही नंतर नव्याने प्राधिकरणाकडे सोमवारी सादर करण्यात येणार आहे. नव्याने होणाऱ्या या भाडेवाढीला विविध संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.राज्य परिवहन प्राधिकरणामध्ये परिवहन आयुक्त, परिवहन विभागाचे सचिव आणि अर्थ खात्याचे सचिव यांचा समावेश आहे. सोमवारी या प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच नेमकी किती दरवाढ एसटी महामंडळ करणार आहे याबाबतची माहिती समोर येणार आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. दुसरीकडे गाड्यांचे डिझेलचे पैसे निघतील इतके देखील उत्पन्न महामंडळाला मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात या समस्या सोडवायच्या असतील तर तिकीट दरवाढी शिवाय एसटी महामंडळाकडे पर्याय नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्सचालकांनी 20 ते 25 टक्के भाडेवाढ केल्याचं दिसतंय. कधी कधी तर हे ट्रॅव्हल्सवाले दुप्पट भाड घेतात. त्यामुळे दिवाळीत प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. दिवाळीच्या तोंडावर दरवर्षी ट्रॅव्हल्सची भाडेवाढ होते. गेल्या काही महिन्यांत डिझेल दर ही प्रचंड वाढलेत. त्यामुळे यंदाही भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकांचे म्हणणे आहे.