केज दि.25 – शहरातील क्रांती नगर भागाच्या वरच्या बाजूस असलेल्या पडीक विहिरीत एक 9 वर्षाचा मुलगा विहिरीत पडल्याच्या माहितीवरून दुपारी 12 वाजेपासून विहिरीतील पाणी उपसा सुरू आहे.
शहरातील क्रांती नगर भागातील रहिवासी हिरा काळे यांचा बाबा नावाचा नऊ वर्षीय मुलगा दि.25 रोजी दुपारी बाराच्या दरम्यान जवळच असलेल्या विहिरीवर आला होता. परंतु मामा घरी गेला तरी तो मुलगा तिथेच थांबला होता. परंतु सदरील मुलगा विहिरीच्या काठावरून विहिरीत पडला असल्याचे एका लहान मुलीने त्याच्या कुटुंबियांना सांगितले. त्यावरून त्यांनी विहिरीत उतरून पाहिले परंतु विहिरीत पाच ते सहा पुरुष पाणी असल्याने तो दिसून आला नाही. सदरील घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सफौ महादेव गुजर व पोना भोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दुपारपासून दोन मोटारी लावून विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू असून सायंकाळी 6 पर्यंत अर्धे पाणी उपसण्यात आले आहे परंतु अद्यापही मुलाचा ठाव लागलेला नाही.
दरम्यान विहिरीत पाणी भरपूर असल्या कारणाने वेळ लागत असून रात्र झाल्या नंतर अंधारात मोठी अडचण निर्माण होणार असली तरी पाणी उपसा झाल्यानंतरच नेमका काय प्रकार घडला आहे ते स्पष्ट होईल. सदरील ठिकाणी मुलाचे नातेवाईक व परिसरातील लोक ठाण मांडून बसले आहेत.