मुंबई दि.29 – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने ऐनदिवाळीच्या हंगामात पाऊस पडणार आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांना बसणार आहे. या वर्षी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघारी घेतल्यानंतर पावसाने उघडीप घेतली होती. ऐन दिवाळीत पाऊस नागरिकांना झोडपणार असण्याची शक्यता आहे.
दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे तो कमी दाबाचा पट्टा जास्त तीव्र झाला. तर 6 ते 11 नोव्हेंबरच्या दरम्यान तो पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम ईशान्य मोसमी वारे दक्षिण भारतात सक्रिय होऊन त्याठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात देखील हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हांना 1 नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर या दरम्यान रायगड, पुण्यात देखील तुरळक पाऊस पडणार आहे.
दरम्यान, हवामान विभागाने 2 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हांना येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पुणे, रायगड, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने नागरिकांना दिला आहे.