Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यातील सोयाबीनच्या अग्रीम 25% पीकविमा वितरणास सुरुवात…..!

बीड जिल्ह्यातील सोयाबीनच्या अग्रीम 25% पीकविमा वितरणास सुरुवात…..!
बीड दि.31 – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीपाठोपाठ आता भारतीय पीकविमा कंपनी कडूनही दिलासा मिळत असून, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याचे दिसत आहे. बीड जिल्ह्यातील सोयाबीनच्या संभाव्य नुकसानीच्या अग्रीम (आगाऊ) 25% विमा रक्कमेच्या पोटी विमा कंपनीने 150.93 कोटी रुपये मंजूर केले असून शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
           जिल्ह्यात जुलै महिन्यात अनेक महसुली मंडळांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाचे वाढीच्या काळात नुकसान झाले होते. त्यानुसार जिल्हा नियोजनाच्या बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अग्रीम 25% मदतीचा प्रस्ताव विमा कंपनीला पाठवण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश दिले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी 25% अग्रीम चा प्रस्ताव पाठवून विमा कंपनीला तो प्रस्ताव मंजूर करण्याबाबत निर्देशित केले होते. बीड जिल्ह्यासाठी सोयाबीन अग्रीम अंतर्गत एकूण 4 लाख 58 हजार शेतकऱ्यांना 150 कोटी 93 लाख 69 हजार रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून संबंधित महसुली मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वर्ग केल्या जात आहेत. अग्रीम 25% पाठोपाठच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रचंड पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, त्या नुकसानीच्या पोटी भारतीय कृषी विमा कंपनी, कृषी व महसूल विभाग यांनी संयुक्त रित्या केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे एकूण पीकविमा रक्कमा निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण पीकविमा वितरणास सुरुवात होईल अशी माहिती भारतीय पीकविमा कंपनीचे व्यवस्थापक श्री. इनकर यांनी दिली आहे.
               दरम्यान, अग्रीम (आगाऊ) 25% प्रमाणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांचे वितरण हा शेतकऱ्यांना प्राथमिक दिलासा देण्यासाठी असून सोयाबीन सह अन्य विमा संरक्षित केलेल्या पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे विमा कंपनीने कळवले आहे. लवकरच एकूण विम्याच्या रक्कमा शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
शेअर करा
Exit mobile version