केज दि.२ – मागच्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु सर्वात जास्त नुकसान गेवराई आणि केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले. त्याची भरपाई म्हणून या दोन तालुक्यांना जिल्ह्यात सर्वाधिक निधी प्राप्त झाला असून केज तालुक्यातील जवळपास सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान उद्या दुपारपर्यंत मिळणार आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. तालुक्यातील सर्वच भागातील उभी पीके वाहून गेली. मात्र हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी एवढी जरी भरपाई जाहीर झाली नसली तरी जेवढी रक्कम आली तेवढी उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
दरम्यान, केज तालुक्यासाठी एकूण ९६७८९ शेतकऱ्यांसाठी ६९ कोटी ४५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे यासाठी लागलीच सदरील रकमेचे धनादेश व शेतकरी यादीची प्रक्रिया पूर्ण केली असून उद्या दुपारपर्यंत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची माहिती तहसीलदार मेंडके यांनी दिली.