मुंबई दि.3 – राज्याच्या पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलिस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरू होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना मोठा फायदा होईल.
गृह विभागातील जवळपास साडेपाच ते सहा हजार पोलिस कर्मचारी दरवर्षी सेवानिवृत्त होतात. कोरोना काळात काही पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गृह विभागातील संपूर्ण पदे भरलेली असणे आवश्यक आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 2020 व 2021 या दोन वर्षातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविली जाणार आहे. सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरू आहे. या भरतीत सुरवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली असून आता मैदानी चाचणी सुरू आहे. दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात, परंतु लेखी परीक्षेत मागे पडतात. त्यात विशेषत: ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या मोठी असते. त्यामुळे 2019 मध्ये पोलिस भरतीच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता पुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयाने दिली. 2020 व 2021 या दोन वर्षातील जवळपास 13 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया एकत्रिपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. बिंदुनामावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरतीस मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदे भरती जातील.
दरम्यान, पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर आतापर्यंत उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागत होती. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांचीच मैदानी चाचणी घेतली जात होती. त्यामुळे मैदानी चाचणीत हुशार असलेले विशेषत: ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार भरती प्रक्रियेतून बाहेर जायचे आणि पुस्तकी ज्ञानात पुढे असलेले उमेदवार पुढे जायचे. तरीही, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये अनेक उमेदवारांची छाती, उंची कमी असलेले असायचे. त्यामुळे आता सर्वप्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बसता येणार आहे. या नवा बदलामुळे लेखीत हुशार, पण मैदानी चाचणीचे निकष पूर्ण करणाऱ्यांना बाहेर काढणे सोयीचे होणार आहे.