केज दि.३ – अठरा वर्षे वय पूर्ण झालेल्या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी संपूर्ण देशात मोठे अभियान राबवले जात आहे.विविध माध्यमातून नागरिकांची जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घेण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातील प्रत्येक गावांत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे.
कोरोना लसीकरणाच्या वेग मंदावलेला आहे. अनेक लोकांच्या मनात कांही चुकीचे भ्रम निर्माण झाल्याने ते लसीकरणाला प्रतिसाद देताना दिसत नाहीत.आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार आवाहन करूनही तालुक्याचा टक्का वाढताना दिसत नाही. परंतु या सर्व गोष्टींवर मात करून लसीकरण वेगाने करण्यासाठी तालुक्यातील सर्वच गावांत नोडल अधिकारी व शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून दि.१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरवाड्यात गाव, वस्तीवर जाऊन प्रत्येक कुटुंबातील सर्व १८ वर्षांपुढील नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे.यासाठी नोडल अधिकारी, शिक्षक यांच्यासह आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी यांची मदत घेण्यात येणार असून १००% उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न होणार आहे.
दरम्यान केज तालुक्याची लसीकरणाची टक्केवारी ही ५६% असून तालुक्यातील केकाणवाडी, पळसखेडा, केवड, साळेगाव, विडा आणि कोल्हेवाडी या गावचे १००% लसीकरण झाले असून इतर गावातही हे उद्दिष्ट गाठण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले तसेच गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी केले आहे. तर या संदर्भात तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची आज तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली असून नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.