Site icon सक्रिय न्यूज

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार…….!

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार…….!

पुणे दि.4 – राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी महास्टुडंट ऍप विकसित केले असून, या ऍपचा वापर सुरू करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

                     महास्टुडंट ऍपच्या वापरास मान्यता देण्यात आल्याचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले. तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने राज्यात सरल प्रणालीवर सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात आली आहे.भारत सरकारने विकसित केलेल्या परफॉर्मन्स ग्र्रेंडग इंडेक्समध्ये (पीजीआय) शिक्षक आणि विदयार्थ्यांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी गुण आहेत. त्यामुळे राज्याने विकसित केलेल्या सरल प्रणालीमध्ये शाळांच्या विद्यार्थी, शिक्षकांच्या माहितीच्या आधारे राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महास्टुडंट हे ऍप विकसित केले.हे ऍप प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऍपमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवण्याची सुविधा शिक्षकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शिक्षकांची उपस्थितीही या ऍपवरच नोंदवता येईल.

दरम्यान, या ऍपमुळे राज्य, जिल्हा, तालुका आणि केंद्र स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती एका क्लिकद्वारे कळू शकणार आहे. तसेच आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक स्वतंत्रपणे ठेवण्याची गरज नाही, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. दोन ऍपचे एकत्रिकरण महास्टुडंट ऍपच्या वापरामुळे मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची वेगळी माहिती भरण्याची गरज नाही. दोन्ही ऍपचे एकत्रीकरण करण्यात येईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शेअर करा
Exit mobile version