Site icon सक्रिय न्यूज

सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…….!

सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…….!

मुंबई दि.९ – दिवळी सणामध्ये कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झालीय. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कर्तव्यावर रुजू होणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय. तर दुसरीकडे या संपामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. खासगी वाहनचालकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आलीय. हा निर्णय तात्पुरता असेल.

मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप सुरु आहे. एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करावा ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत हा संप सुरु असून त्याने व्यापक रुप धारण केलंय. सध्या दिवाळी सणाची धूम आहे. राज्यात नागरिक तसेच चाकरमाने आपापल्या गावाला मोठ्या प्रमाणात जातात. बसेसने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या लाखोंमध्ये असते. असे असताना कर्मचारी संपावर गेल्यामुळे राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्याच कारणामुळे राज्य सरकारने आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी तात्पुरती असल्याचं परिपत्रकात नमूद करण्यात आलंय.

तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे लोण आता महाराष्ट्रभर पसरले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय. राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जातेय. पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एकट्या स्वारगेट डेपोतून जाणाऱ्या 200 एसट्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. या डेपोमधून जवळपास 136 चालक आणि 128 वाहक संपात सहभागी झाले आहेत. तर हिंगोली, कोल्हापूर अशा जिल्ह्यातदेखील कर्मचारी संपावार आहेत.

दरम्यान, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचा हा संप सुरुच राहील, असा पवित्रा सर्वच एसटी कामगारांनी घेतलाय. तर दुसरीकडे सध्या दिवळीचा हंगाम आहे. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर रुजू व्हावे असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे.

शेअर करा
Exit mobile version