बीड दि.9 – राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दि.27 ऑक्टोबर रोजी दिवाळी सुट्ट्यांची घोषणा केली होती. त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चाही झाली होती. परंतु त्यांनी जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून सुट्ट्यांची सुधारित तारीख प्रत्येक जिल्ह्याने घोषित केली असून बीड जिल्ह्यात आता 16 नोव्हेंबर पर्यंत सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (मा) विक्रम सारूक तसेच श्रीकांत कुलकर्णी यांनी काढलेल्या आदेशात शाळा आता 11 तारखे ऐवजी 17 तारखेला सुरू होतील असे सांगितले असून उच्च माध्यमिक साठीचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडण्यात आला आहे. तर ज्या शाळेत दि.१२ रोजी राष्ट्रीय संपादणूक परीक्षा आहे त्यांनी दि.11 व 12 रोजी शाळेत उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, अगोदर 1 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्या लागतील असे गृहीत धरून अनेकांनी गावी जाण्याचे व येण्याचे नियोजन केले होते. मात्र 11 पर्यंत सुट्ट्या जाहीर झाल्याने ते नियोजन बदलावे लागले होते आणि आता आणखी तीन चार दिवसांसाठी झालेला बदल पुन्हा नियोजन बारगळणारा आहे.