Site icon सक्रिय न्यूज

एकीकडे 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन तर संधी आल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट……!!!

एकीकडे 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन तर संधी आल्याने खाजगी प्रवाशी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट……!!!

मुंबई दि.9 –  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाता आता तीव्र स्वरुप धारण केलंय. तर दुसरीकडे आता राज्य सरकारनेदेखील कडक पवित्रा धारण केलाय. एसटी महामंडळाने एकूण 45 आगारांमधील तब्बल 376 कर्मचाऱ्यांचे निलबंन केलं आहे. नांदडे, यवतमाळ, वर्धा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे ही कारवाई करण्यात आलीय.

एसटी महामंडळाचे कर्मचारी मागील अनेक दिवसांपासून संपावर आहेत. राज्यभरात हा संप सुरु असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. एसी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मुख्य मागणी आहे. या आंदोलनादरम्यान एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्यादेखील केली. ऐन दिवळीत संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत असून कामावर रुजू व्हावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तर दुसरीकडे आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत संप मागे घेतला जणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर एसी महामंडळाने निलंबनाचे हत्यार उपसले आहे. आतापर्यंत 16 विभागातील 45 आगारांमधील 376 एसटी कर्मचाऱ्यांचे निलबंन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, भंडारा, औरंगाबाद, नागपूर, जालना अशा विभागांचा समावेश आहे. नांदेड, यवतमाळ सांगली या तीन विभागामध्ये एकूण 150 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

तर नाशिक- 17,  वर्धा- 40, गडचिरोली- 14, चंद्रपूर-14, लातूर- 31, नांदेड-58, भंडारा-30, सोलापूर-2, यवतमाळ-57, औरंगाबाद-5, परभणी-10, जालना-16, नागपूर-18, जळगाव-4, धुळे-2 सांगली-58 अशा एकूण 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान बस वाहतूक बंद असल्याने खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे फावले असून मनमानी भाडे वसूल करण्यात येत आहे. जिथे बसला 60 रुपये तिकीट आहे तिथे खाजगी वाहतूक करणारे 100 रुपये भाडे वसूल करत असून गाड्या खचाखच भरून प्रवाशांना वेठीस धरत आहेत. मात्र ऐन दिवाळीत पर्याय नसल्याने प्रवाशी मूग गिळून म्हणतील तेवढे भाडे देत आहेत.

शेअर करा
Exit mobile version