मुंबई दि.13 – त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीसह राज्यातील काही भागात मोर्चे निघाले. या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यता आली नव्हती. केवळ निवेदन देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, मोठा जमाव जमल्याने हिंसेच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं असून या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.
अमरावतीत भाजपने बंद पुकारला आहे. त्याआधीच काल मी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी फोनवर बोललो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणं झालं. बंद शांततेत पाळण्याचं त्यांनाही विनंती केली. सहकार्याची विनंती केली. अमरावतीत शांतता राखण्याचं आवाहन केलं, असं त्यांनी सांगितलं. काही लोक चिथावणीखोर विधानं करत आहेत. अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. समाजात विद्वेष करणारं वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करू. रझा अकादमीच्या माध्यमातून काल आंदोलन केलं होतं. त्यात कोणत्या संघटना होत्या त्याची माहिती घेत आहे. मात्र, या आंदोलनाला कुणालाही परवानगी नव्हती. आंदोलक केवळ निवेदन देणार होते म्हणून त्यांना परवानगी दिली. त्यावेळी ही घटना घडली, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, त्रिपुरात घटना घडली तर त्याचा निषेध महाराष्ट्रात आंदोलन करण्याची गरज नाही. काही लोकांनी तरीही निवेदनासाठी परवानगी मागितली होती. ती दिली. त्यावेळी मोठा मॉब जमला आणि त्यातून अप्रिय घटना घडली. सध्या राज्याच्या सर्व भागात शांतता आहे. घटना केवळ अमरावतीत घडत आहे. थोड्या वेळात परिस्थिती नियंत्रणात येईल, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात दंगल भडकेल, दोन समाजात तणाव निर्माण होईल असे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल करू नका. अफवा पसरवू नका आणि सामाजिक विद्वेष वाढेल असं काही करू नका, असं आवाहन करतानाच वृत्तवाहिन्यांनी वार्तांकन करताना व्हिडीओ दाखवताना त्यावर घटनेची वेळ टाका. नाही तर ती घटना अजूनही चालू आहे असं चित्रं निर्माण होईल, असं त्यांनी सांगितलं.