पुणे दि.15 – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.
26 ऑक्टोबरला तोल जाऊन पडल्यानं बाबासाहेब पुरंदरेंच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कालांतरानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं.
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले. त्यानंतर इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय. 29 जुलै 1922 रोजी बाबासाहेबांचा जन्म झालाय, तर 14 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचं निधन झालंय. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडकेंबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय.
दरम्यान, शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची 17 वी आवृत्ती 31 मार्च 2014 ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने 2015 साली महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कारही दिलाय, तर 2019 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले होते.