नवी दिल्ली दि.16 – राजधानी क्षेत्रात (NCR)संपूर्ण लॉकडाऊन लावण्यास तयार असल्याचं केजरीवाल सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. हवेच्या प्रदूषणावर नियंत्रिण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.एनसीआर आणि शेजारील राज्यांमध्ये असा निर्णय लागू केला तरच तो अर्थपूर्ण ठरेल, असं युक्तीवादात नमूद करण्यात आलंय.
राजधानी दिल्लीवर मागील एक आठवड्यापासून प्रदुषणाचे ढग घोंगावत आहेत. संपूर्ण शहरात प्रदुषणाच्या पातळीने उच्चांक गाठलाय. खबरदारी म्हणून राज्य सरकारने एक आठवडा शाळांना सुट्टी दिली असून बांधकामं सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला राजधानीतील हवेच्या प्रदुषणावरून फटकारलं होतं. यानंतर न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, दिल्ली सरकारने काही उपाय सुचवले आहेत. दिल्लीचा संक्षिप्त आकार पाहता, लॉकडाऊनमुळे हवेच्या गुणवत्तेवर मर्यादित परिणाम होईल, असं ‘आप’ने म्हटलंय.
दरम्यान, दिल्ली सरकारने कोर्टात काही महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांमध्ये, यंदा फेब्रुवारी ते सप्टेंबर या कालावधीत एअर क्वालिटी इंडेक्स गंभीर श्रेणीत गेलेला नाही. ऑक्टोबर 2021 हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात कमी प्रदुषाचा महिना असल्याचं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं. पंजाब आणि हरियाणामध्ये केवळ 675 स्टबल जाळण्याच्या घटना घडल्या आहेत.