मुंबई दि.16 – कृषीपंप योजना जोडणी धोरण २०२० अंतर्गत कृषी ग्राहकांची सुधारीत सप्टेंबर २०२० च्या योजना बिला नुसार गोठविण्यात आलेली असून सदर रक्कमेवर कुठलेही व्याज किंवा विलंब आकार लागणार नाही. सदर रक्कम ग्राहकास सवलतीच्या काळात म्हणजेच पुढील ३ वर्ष (३१ मार्च २०२४) भरण्याची सुविधा ग्राहकास देण्यात आलेली आहे.त्यामुळे सप्टेंबर २०२० च्या बिलातील गोठविण्यात आलेल्या थकबाकी करीता कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये असे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
सदर धोरणा अंतर्गत कृषी ग्राहकांच्या विजबिलाबाबत कोणतीही तक्रार असल्यास सदर तक्रारीचे निवारण करून थकबाकी रक्कम पूर्णगठित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या परीपत्रकात देण्यात आलेल्या आहेत. तसेच कृषी धोरण २०२० अंतर्गत चालू वीज बिल भरणा न करणाऱ्या वीज ग्राहकांना कलम ५६ नुसार वीज पुरवठा खंडीत करण्याबाबत नोटीस बजावणे आवश्यक आहे व त्यानंतरच संबंधीत वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात यावा. परंतु या बाबत क्षेत्रिय कार्यालयांकडुन निर्देशांचे पालन केले जात नाही, असे निदर्शनास आलेले आहे. सदर बाब गंभीर असून कृषी धोरणाच्या अंतर्गत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणारी आहे.
दरम्यान, परीपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे की, ज्या कृषि ग्राहकाने चालु वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यांचा वीज पुरवटा गोठविलेल्या थकबाकी साठी खंडीत करण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही ग्राहकाची बीज बिला बाबत कोणतीही तक्रार असल्यास त्या तक्रारीचे प्राधान्याने निवारण करून सदर कृषी ग्राहकाची थकबाकी पुनःनिर्धारीत करावी व सुधारीत थकबाकी भरण्याकरीता धोरणा अंतर्गत कृषी ग्राहकांना देण्यात आलेल्या सवलती बाबत अवगत करून ग्राहकाला कृषी धोरणाचा जास्तीत जास्त लाभ कशाप्रकारे घेता येईल याबाबत सविस्तर माहिती द्यावी.असे क्षेत्रिय कार्यालयांना निर्देशित करण्यात आले असून वरील निर्देशाचे तंतोतंत पालन करावे, तसेच या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले आहे.