मुंबई दि.17 – महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुढचे येणारे 4 ते 5 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. दोन दिवसांपुर्वीच हवामान विभागाने संपुर्ण राज्यात 4 दिवस पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला होता. त्यातच अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्याचं पाहायला मिळालं.
15 नोव्हेंबर रोजी हवामान विभागाने पत्रक जारी करून पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. आता ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगबाद, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्य़ात आला आहे. आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळताना पाहायला मिळत आहेत. मराठवाड्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं. तसेच आता ऐन दिवाळीतही पाऊस येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वातावरणात अचानक बदल झाल्याने सर्दी, पडसे आणि एकूणच आरोग्यावर त्याचा परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे. पुढचे 5 दिवस आता महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.