नवी दिल्ली दि.१९ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची घोषणा मोदींनी यावेळी केली आहे.
मोदी यावेळी म्हणाले, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही 3 कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना ताकद मिळावी. हा यामगचा उद्देश होता. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा करून आम्ही हे कायदे आणले होते. मात्र या कृषी कायद्यांना विरोध झाल्यानंतर हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आता आम्ही हे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेत आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती, असं त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले, आम्ही एमएसपी वाढवली, रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडलं. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू लागला. आम्ही बाजार समित्यांच्या विकासावर काम केलं, असंही त्यांनी सांगितलं आहे.