Site icon सक्रिय न्यूज

ज्वारीला पाणी देत असताना दोन सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू……!

ज्वारीला पाणी देत असताना दोन सख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू……!
बीड दि.१९ – रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी शेताच्या कुंपणात शेतकऱ्याने वीज सोडली असता संबंधित शेतकऱ्याच्या शेजारच्या शेतकऱ्याला याची मोठी किंमत मोजावी लागली. रात्रीच्या दरम्यान ज्वारीला पाणी देत असताना विजेचा प्रवाह असलेल्या तारेला हात लागल्याने एका शेतकऱ्याला शॉक लागला असता त्याचा भाऊ त्याच्या मदतीला धावला. मात्र दुर्दैवाने दोघांनाही विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. या दुर्दैवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या लाईटमुळेच हि दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख  असे मृत्यू झालेल्या शेतकरी भावांची नावे आहेत.
   पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना रान डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकऱ्यांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था याकडे दुर्लक्ष करते म्हणून या भागातील शेतकरी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. नाळवंडी येथील रवी ढोले यांनी आपल्या शेतातील पिकांचे रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी तारेचे कुंपण करुन त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. रात्री त्यांच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख हे रात्रीची वीज असल्याने गुरुवारी रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते. यावेळी हुसेन फकीरभाई शेख यांचा कुंपणाच्या विद्यूत प्रवाह सोडलेल्या त्या तारेला हात लागला. त्याचवेळी त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडण्यासाठी त्याठिकाणी गेले, मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत असून रात्रीच्या वीजेमुळेच दोन सख्या शेतकरी बांधवांचा जीव गेल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
शेअर करा
Exit mobile version