बंगालच्या “खाडीत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत मिळाले असून त्यामुळे थबकलेला मान्सून आणखी वेगाने पुढे पूर्वेला आगेकूच करेल,अशी शुभवार्ता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या अनेक भागांत सक्रिय होण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेने मागील चार दिवसांत जोरदार मजल मारत कारवारपर्यंत धडक मारली़ त्यानंतर मात्र ४ जूनपासून त्याचा प्रवास थांबला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील मान्सूनची वाटचाल शनिवारीदेखील सुरू राहिली.
मान्सूनने कर्नाटकातील आणखी काही भाग, तामिळनाडू, पाँडिचेरी, कराईकल, बंगालच्या उपसागरातील बहुतेक भाग, बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भाग, उत्तर पूर्व भागात प्रवेश केला आहे़ येत्या २ ते ३ दिवसांत तामिळनाडूचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटकाचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात मान्सूनच्या आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे़ ८ जून रोजी बंगालच्या खाडीत मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल. परिणामी, आंध्र प्रदेश, ओडिशाच्या किनारी ९ जून रोजी पावसाळी घडामोडी वेगाने घडतील.
१० जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र ओडिशालगत दाखल होईल. यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगढ, येथे अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.