बीड दि.21 – भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. मराठवाड्यातील बीड , उस्मानाबाद , लातूर , नांदेड या जिल्ह्यांना पुढचे 48 तास येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई, धारुरसह अनेक भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
पुढचे 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढच्या 48 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हवेची स्थिती पाहता प्रादेशिक हवामान विभागाकडून अंदाज जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सागंली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना 21 नोव्हेंबरसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.