केज दि.29 – घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात राहते घर पेटवून दिल्याने लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू, कपडे, रोख रक्कमेसह ८० हजाराचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे २९ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
विडा येथील विधवा महिला नीता पोपट वाघमारे ह्या स्वस्त धान्य दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांचा मुलगा पुण्याला नातेवाईकांकडे गेलेला आहे. तर २८ नोव्हेंबर रोजी त्या घराला कुलूप लावून एका मुलीसह दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी केजला आल्या होत्या. घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने २९ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या पूर्वी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील समान पेटवून दिले. त्यांच्या शेजारी अर्चना दादाराव वाघमारे यांनी घरातून धूर निघत असल्याचे पाहून त्यांना फोन करून माहिती दिली. त्या केजहून पहाटे ३ वाजेच्या सुमारास गावी पोहचल्या. त्यांनी व शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिले असता या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, टी. व्ही., होम थेटर, स्वस्त धान्य दुकानाचे झेरॉक्स कागदपत्रे, नगदी १० हजार रुपये जळून खाक झाले. या आगीत त्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. नीता वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार प्रमोद यादव हे पुढील तपास करत आहेत.