केज दि.30 – नगरपंचायतीच्या रणधुमाळीत रिपाइंने ही उडी घेतली असून जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशाने रिपाइं आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपाईचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली.
केज नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष आणि वेगवेगळ्या आघाड्या यांनी काही प्रभागात आपले संभाव्य उमेदवार फिक्स केले आहेत. तर काही उमेदवारांच्या बाबतीत तडजोडी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशाने केज येथे तालुका अध्यक्ष दिपक कांबळे आणि शहराध्यक्ष भास्कर मस्के यांनी एक बैठक घेतली. बैठकीत केज नगरपंचायतीच्या निवडणुकीत रिपाइं संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला रवींद्र जोगदंड, बाळासाहेब ओव्हाळ, ईश्वर सोनवणे, विकास आरकडे, दिलीप बनसोडे, गौतम बचुटे हे उपस्थित होते.
दरम्यान, आम्ही शहरातील मूलभूत सुविधा आणि लोकांच्या अडीअडचणी बाबत कायम त्यांच्या बाजूने असून प्रशासना सोबत विकासाच्या मुद्द्यावर आंदोलने केली आहेत. त्यामुळे आम्ही कायम मतदारांच्या संपर्कात असल्याचे मत दिपक कांबळे यांनी व्यक्त केले.