केज दि.5 – युसुफवडगाव पोलिसांनी गांजपुर ( ता. धारूर ) येथील पानटपरीवर छापा मारून देशी दारूच्या बाटल्या व गावठी दारू जप्त केली. टपरी चालक फरार असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, सपोनि विजय आटोळे, जमादार नागरगोजे, पोलीस नाईक शामराव खनपटे यांचे पथक रविवारी दुपारी गांजपुर – उंदरी रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. त्यांना या रस्त्यावरील एकापानटपरीतून देशी व गावठी दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांचे पथक पानटपरीवर छापा मारण्यास गेले असता टपरी चालक हा पोलिसांना पाहून पळून गेला. पोलिसांनी टपरीची झडती घेतली असता टपरीत देशी दारूच्या ६० बाटल्या व गावठी दारू २० लिटर मिळून आली. पोलिसांनी ३ हजार १०० रुपये किंमतीची देशी व गावठी दारू जप्त केली आहे. पो. काँ. बालासाहेब घोरपडे यांच्या फिर्यादीवरून दिलीप डापकर याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार नागरगोजे पुढील तपास करत आहेत.