कळंब दि.6 – कळंबमध्ये एका तरुणाकडे पिस्तुल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पिस्तुलसह मॅगजीन आणि 4 जिवंत काडतूस देखील संबंधित तरुणाकडून जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शहरालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये एकजण पिस्तुल घेऊन बसलेला असल्याची माहिती मिळाली. त्यादरम्यान सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, पोलिस उपनिरीक्षक मालुसरे, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम पतंगे, सय्यद, सादिक शेख, काटवटे रात्रगस्तसाठी करत होते. माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तात्काळ त्या हॉटेलकडे धाव घेतली. तेथे संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल, मॅक्झिन सह चार जिवंत काडतूस मिळून आले. त्याच्याकडील आधार कार्डवरून तो औरंगाबाद येथील रहिवासी असून राहुल दिलीप गायकवाड असे नाव आहे. पोलिसांनी त्याला कळंब पोलीस स्टेशनला आणून जप्ती पंचनामा करून त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम 1959 अन्वये कलम तीन 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल विक्रम मेघराज पतंगे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली आहे.
संबंधित तरुण हा औरंगाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर त्याच्याकडून बिना नंबर प्लेटची एक दुचाकी, मोबाईल असा 92 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोणत्या कारणासाठी तो पिस्टल बाळगून होता? कळंबमध्ये कशासाठी आला होता? कळंबमध्ये कुणासोबत त्याचे धागेदोरे आहेत? याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चाटे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, कळंबमध्ये 4 महिन्यापूर्वी अशीच एक घटना घडली होती. कळंब-ढोकी मार्गावरील एका हॉटेलमध्ये एक तरुण पिस्टल घेऊन बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल आढळून आली. मात्र अधिक माहिती घेतली असता ती खरीखुरी बंदूक नसून लायटर असल्याचं निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित तरुणाला समज देऊन सोडून दिले होते. मात्र 4 महिन्यानंतर सदरील घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आणि यात आता लायटरवाली नसून खरीखुरी जिवंत काडतुसेसह पिस्तुल आढळून आली आहे.