केज दि. ७ – कोरोना च्या संकटाने शेतकरी हतबल झाले आहेत.तर लॉकडाऊन मध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र तालुक्यातील जवळबन येथील पावर ट्रांसफार्मर दि १ जूनला जळाला असून मागील सात दिवसापासून बंद आहे.
परिसरातील सारणी, आनंदगाव, जवळबन,भाटुंबा आदी गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.पाणीटंचाई मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने तात्काळ ट्रांसफार्मर बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे. महावितरण ने तात्काळ ट्रँसफार्मर दुरुस्त करून विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास नागरिकांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देण्यात दिला आहे.जवळबन येथील धरणातून चंदनसावरगाव, भाटुंबा, आनंदगाव, जवळबन, सारणी आदि गावांना पाणीपुरवठा केला जातो. ट्रांसफार्मर बंद पडल्याने या गावचा पाणीपुरवठा बंद आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी नाही, गुरांना पाण्यासाठी इतर गावच्या शिवारात घेऊन जावे लागत आहे.
आमदारांचा पाठपुरावा सुरूच
याबाबत मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा
यांनी महावितरण विभागाशी संपर्क केला असून पाठपुरावा सुरू आहे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
ऊस लागवड रखडली
यावर्षी शेतकऱ्यांनी ऊस लागवड अधिक प्रमाणात सुरू केली आहे. शेतात उसाचे बियाणे आणून ठेवले असून मशागतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अचानक विद्युत पुरवठा बंद पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ऊस लागवडीसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांच्या माथी बसत असून आणलेले बियाणे वाळून गेल्याने लागवडीला विलंब होत आहे. तात्पुरत्या स्वरूपात बनसारोळा, युसुफवडगाव वरून काही वेळ विद्युत जोडणी केली जात आहे. मात्र वीजपुरवठा होत नाही विद्युत मोटार सुरू होत नाहीत.