Site icon सक्रिय न्यूज

अंबाजोगाई केज दरम्यान चंदन सावरगाव जवळ पाचजण घेतले ताब्यात…..!

अंबाजोगाई केज दरम्यान चंदन सावरगाव जवळ पाचजण घेतले ताब्यात…..!
नेकनूर दि. ९ – येळंबघाट ( ता.बीड ) जवळ काही लोक संशयास्पद अवस्थेत अंधारात दडून बसले आहेत. अशी माहिती नेकनूर पोलीसांना मिळाली, त्यावरून वेळ न घालवता पोलीसांनी धाव घेतली. पोलीसांची गाडी पहाताच चोरट्यांनी वाहनासह धुम ठोकली. मात्र पोलीसांनीही पाठलाग करुन केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कुऱ्हाड, मिरची पावडर,लाकडी दांडे सह आदि साहित्य मिळून आल्याने ते चोरीच्या तयारीत होते असा संशय व्यक्त केला जात आहे.
                 नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत सुलतानपूर आणि सफेपूर येथे मारहाण करुन धाडसी चोरी व नेकनूर येथे चोरीचा प्रयत्न केल्याची घटना काल बुधवारी उघडकीस आली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. रात्रीची गस्त सुरू केली असून यादरम्यान नेकनूर पोलीसांना येळंबघाट जवळ ४ ते ५ जण अंधारात लपून बसले असून, एक पांढरी गाडी उभी असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच नेकनूर पोलीसांनी येळंबघाटकडे धाव घेतली. मात्र पोलीसांची गाडी त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी वाहनासह पळ काढला. त्यामुळे पोलीसांचा अधिकच संशय वाढल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. अंबाजोगाई-केज दरम्यान चंदन सावरगाव येथे वाहन सोडून जंगलातून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांना झडप घालून पोलीसांनी पकडले. संशयितांच्या ताब्यातील टाटा सफारीची झडती घेतली असता आतमध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडे, मिरची पावडर सह आदि साहित्य मिळून आले. त्यामुळे हे पाच जण चोरीच्या उद्देशाने लपून बसले होते असा संशय व्यक्त केला जात आहे.
              दरम्यान, हे पाचही जण सराईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे. या धाडसी कारवाई बद्दल नेकनूर पोलीसांचे आभार मानले जात आहे. काल उघडकीस आलेल्या चोरीच्या घटनांमध्ये यांचा समावेश आहे का? याची चौकशी पोलीस करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version