पुणे दि.12 – इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी एक महत्वाची बातमी आहे. 10वी बरोबरच आता 12वीच्या बोर्ड परीक्षांचे (12th Exam From) ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्यास शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कांसह 18 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. तर 24 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षेचा अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) देण्यात आली आहे. राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डानं हे परिपत्रक काढलं आहे.
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत असं सांगण्यात आलं होतं. तर आधीच्या तारखेनुसार विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येणार होते. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2021 असा देण्यात आला होता.उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट सोमवार दि. 27 डिसेंबर 2021 रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कळवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावी प्रमाणे दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात. तर, विलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 28 डिसेंबरपर्यंत आहे.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं आयोजन करण्यासाठी बोर्डाकडून तयारी सुरु आहे. वेळापत्रक तयार करण्यात आलं असून शासनाच्या मान्यतेची आवश्यकता आहे. तर परीक्षा केंद्र, कोरोना नियमांचं पालन आणि परीक्षक यासंदर्भात माहिती मागवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सीबीएसई प्रमाणं दहावी आणि बारावीसाठी सेमिस्टर पद्धत लागू करण्यात आलेली नाही. मात्र, शाळा पातळीवर घटक चाचणी आणि प्रथम सत्राच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत. त्यामुळं ओमिक्रॉनचं संकट वाढल्यास शालेय पातळीवर दुसऱ्या सत्राची परीक्षा घेतली जाऊ शकते.
दरम्यान, दहावी बारावीच्या शाळा नियमित आणि व्यवस्थित सुरु असल्यानं विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं. परीक्षा घेण्याच्या काळात आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास पर्यायाचा विचार होईल. मात्र, सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.