केज दि.२० – नगरपंचयात निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मागच्या कांही दिवसांपासून सुरू असलेला जाहीर प्रचार आज थंडावणार असून उद्या प्रत्यक्ष मतदान होणार आहे.त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार रजनीताई पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सदरील सभेच्या माध्यमातून प्रचाराची सांगता होणार आहे.
केज नगरपंचयात निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे चार वार्ड वगळता इतर 13 वार्डाची निवडणूक होत आहे. सदरील निवडणुकीत कांही ठिकाणी दुहेरी तर कांही ठिकाणी तिहेरी लढत होत आहे. प्रत्येकाने उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या वतीने सकाळी दहा वाजता मोटारसायकल रॅली निघणार असून दुपारी 12.30 वाजता वकिलवाडी हनुमान मंदिराच्या मैदानावर खासदार रजनीताई पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.सदरील सभेसाठी माजीमंत्री अशोकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून काझी बदियोद्दीन अहमदोद्दीनन हे सभेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख,जेष्ठ नेते सुरेश पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष ताहेर कुरेशी यांचीही उपस्थिती असणार आहे.
दरम्यान सदरील सभेत खासदार रजनीताई विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे लक्ष लागले असून शहरातील नागरिकांनी जाहीर सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह पशुपतीनाथ दांगट, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे, प्रविणकुमार शेप तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.