केज दि.२९ – लसीकरणाची मोहीम अधिक गतीने राबविण्यासाठी कोव्हिड लसीकरण आता लग्न तिथी दिवशी लग्न मंडपात आणि आठवडी बाजारात करण्याचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी तालुका प्रशासनाला आदेश दिले आहेत. या बाबत १ जानेवारी ते १० जानेवारी रोजी केज तालुक्यातील गावागावात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे.
केज तालुक्यात कोव्हिड लसीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि ओमीक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलली आहेत. लग्न समारंभात आलेल्या वऱ्हाडी मंडळींचे लसीकरण करण्यासाठी आता थेट लग्न मंडपाच्या दारातच लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी तहसीलदार दुलाजी मेंडके आणि नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना या संबंधी सूचना दिल्या आहेत.
तसेच १ जानेवारी ते १० जानेवारी २०२२ या नवीन वर्षात केज तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासन यांनी केले आहे.