बीड दि.30 – राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.मात्र सर्वाकांही पूर्वपदावर येत असतानाच राज्यातील Covid-19 ची दुसरी लाट ओसरल्यानंतर सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.
राज्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा विळखा घट्ट होत असून कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले आहेत. तरीही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरीकडे, रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी असतानाही रस्त्यावर सर्रास गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील नऊ कोटी 14 लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. तरीही, अद्याप एक कोटी व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतला नसून दुसरा डोस घेण्याचा कालावधी संपूनही जवळपास 82 लाख व्यक्तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून गावोगावी लसीकरण मोहीम आयोजित करूनही आणि दोन्ही डोस न घेतलेल्यांवरील निर्बंध कडक करूनही लसीकरण 100 टक्के झालेले नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुरवातीला सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे
दरम्यान, मुंबई (8060), ठाणे (1638), पालघर (298), रायगड (317), पुणे (2053), सातारा (180), सांगली (90), कोल्हापूर (60), सोलापूर (89), नाशिक (412), नगर (385), औरंगाबाद (54), नागपूर (137), रत्नागिरी (44), सिंधुदुर्ग (12), जळगाव (9), नंदुरबार (4), धुळे (2), जालना (16), बीड (39), लातूर (33), परभणी (19), हिंगोली (1), नांदेड (20), अमरावती (8), अकोला (24), वाशिम (1), बुलढाणा (10), यवतमाळ (7), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (8), चंद्रपूर (6) आणि गडचिरोली (7) असे सक्रिय रुग्ण आहेत.