बीड दि.३० – पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे हे काम नाही. तर समाजातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना न्याय मिळवून देणेही गरजेचे आहे. या दोन्ही भुमिका पार पाडतांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून समाजातील वृद्धांच्या आयुष्यांना प्रकाशमान करण्याचा निर्णय पत्रकार अशोक शिंदे यांनी घेतला आहे. वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून वयोवृद्धांच्या व नजर धुसर झालेल्या लोकांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचं काम ते करणार आहेत. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
नेकनूर सारख्या ग्रामीण भागातून पत्रकारिता करतांना वंचित, उपेक्षीतांचे प्रश्न मांडण्याचं काम अशोक शिंदे यांनी सातत्याने केले आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून पिडीतांना न्याय देण्याचं काम त्यांनी सातत्याने केले आहे. सामाजिक भान ठेवून पत्रकारिता करतांना अडल्या नडल्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम ते सतत करत असतात. राजकीय, सामाजिक, क्रिडा, कृषी, कला, शिक्षण सारख्या क्षेत्रातील वंचित व उपेक्षीतांना न्याय देण्याच काम त्यांनी सातत्याने केले आहे. परंतू पत्रकारिता व बातमीदारीच्या पुढे असलेल्या सामाजिक बांधिलकीचे भान शिंदे यांनी राखले आहे.
दि.१ जानेवारी असलेल्या त्यांच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जन्मदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२) नेकनूर येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर शिबीर आहे. तज्ञ डॉक्टरांकडून या शिबीरात रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. तसेच गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
दरम्यान, रुग्णांना शस्त्रक्रियेसह प्रवास, जेवण मोफत दिले जाणार आहे. नेकनूरसह परिसरातील रुग्णांनी व नागरिकांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घ्यावा असे आवाहन आण्णासाहेब पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.