Site icon सक्रिय न्यूज

‘स्क्रीन’ मुळे मुलांमध्ये मानसिक विकार वाढत आहेत…..!

‘स्क्रीन’ मुळे मुलांमध्ये मानसिक विकार वाढत आहेत…..!

नवी दिल्ली दि.1 – कोविड (Covid) प्रकोपामुळे लोकल ते ग्लोबल परिणामांना सामोरे जावे लागले. सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन(Lockdown)चा मार्ग अवलंबण्यात आला. जगाच्या व्यवहाराचं गतिचक्र ठप्प झाल्याने ऑनलाइन (Online) व्यवहारांवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनाही ई-शिक्षणाचा मार्ग धरावा लागला. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. तसेच मुले मोबाइलच्या आहारी गेल्याचे प्रमाण वाढले आहे. कॅनडामध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य अहवालाच्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.

टोरंटोस्थित बालआरोग्य तज्ज्ञांच्या अभ्यासगटाने निष्कर्ष काढले आहेत. विभिन्न प्रकारचे स्क्रीन आणि मानसिक विकारांचा थेट सहसंबंध अभ्यासातून पुढे आला आहे. लहान वयांच्या मुलांमध्ये अधिक वेळ टीव्ही पाहणे आणि गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नैराश्य, शारीरिक हालचालीत असंतुलन, एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्या आढळून आल्या आहेत. अधिक वेळ ‘स्क्रीन’वर व्यस्त असणे आणि सामाजिक संपर्क कमी असणे ही मुख्य कारणे आहेत. विद्यार्थ्यांच्या दिनचर्येत कोविड प्रकोपामुळे अमुलाग्र बदल झाले आहेत. सामाजिक अंतर, एकांतवास आणि दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे मत अभ्यासकांनी नोंदविले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत पालकांनी अधिकाधिक संवाद वाढावा. विद्यार्थ्यांचा ‘स्क्रीन’ टाइम कमी करण्यासाठी पालकांनी उपाय योजायला हवेत. विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखून त्यांना आवडत्या गोष्टींत रममाण होण्यासाठी संधी द्या. चित्रकला, ओरिगामीसारखे छंद जोपासण्यास प्रोत्साहन द्या. विद्यार्थी ‘स्क्रीन’पासून दूर जाण्यास मदत होईल. मोकळ्या मैदानात जाणं शक्य नसल्यास इमारतीचे टेरेस किंवा घरातील मोकळ्या जागेत शारीरिक कसरती/व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा. विद्यार्थ्यांचे नियमित वेळापत्रक बनवा. अभ्यासासोबत छंद, व्यायाम यांनाही वेळ राखून ठेवा. असा सल्ला तज्ञांच्या टीमने दिला आहे.

शेअर करा
Exit mobile version