केज दि.३ – १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार केज तालुक्यातही लसीकरण करण्यात येत असून पहिल्याच दिवशी चार ठिकाणी करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत सुमारे ६२० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना दि.३ जानेवारी पासून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.त्यानुसार संपूर्ण देशात आज लसीकरण सुरू झालेले आहे. त्या अनुषंगाने केज शहरातील स्वामी विवेकानंद शाळेत १६२, रामराव पाटील विद्यालयात २६५, वसंत विद्यालयात १७३ तर विडा आरोग्य केंद्रांतर्गत हनुमान वस्ती येथे ८० अशा एकूण ६२० विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी तहसीलदार दुलाजी मेंडके, गटविकास अधिकारी श्री.नागरगोजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पूजदेकर, डॉ.शिला कांबळे यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान केज तालुक्यातील सर्व शाळांमधील लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून सर्व १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.