केज दि.4 – केज – मांजरसुंबा रस्त्यावरील मस्साजोगजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ट्रक, कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात कारमधील एक व दुचाकीवरील एक जण जखमी झाले असून जखमींना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. दुचाकीस्वाराचा पाय मोडला असून प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे.
केजकडून मांजरसुंब्याकडे निघालेल्या माल वाहतूक ट्रकची ( टी. एस. १३ यु. बी. ३८४८ ) व मांजरसुंब्याकडून आलेल्या कारची ( एम. एच. १४ जीयु ८३५७ ) या रस्त्यावरील मस्साजोग शिवारात समोरासमोर धडक झाली. तर ट्रकच्या पाठीमागे चालत असलेल्या दुचाकीला ( एम. एच. २१ एफ ३०७० ) अपघातग्रस्त कारची धडक बसली. या झालेल्या तिहेरी अपघातात कारमधील ऋषिकेश कदम ( वय २५, रा. धर्माळा ता. केज ) व दुचाकीवरील शकियोद्दीन शेख ( वय ५०, रा. गेवराई ) हे दोघे जखमी झाले. यावेळी तेथून चाललेल्या बीडच्या बॉम्बशोधक पथकातील सहाय्यक फौजदार शिवाजी राठोड, जमादार मच्छिन्द्र बडे, राजेंद्र सांगळे, पोलीस नाईक शिवराज घोंगडे यांनी त्यांची गाडी थांबवून जखमींना उपचारासाठी पाठविण्यासाठी मदत केली. शफोद्दीन शेख यांचा पाय मोडला असून त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी बीडला पाठविण्यात आले आहे. तर ऋषिकेश कदम या तरुणावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.