केज दि.५ – एका महिलेने गाडी भाड्याने करून आडवाटेने गाडी न्यायला सांगून तिच्या साथीदारांनी गाडी रस्त्यात अडवून चालकाला मारहाण करून त्याच्या जवळील नगदी ९० हजार रु. व ११ हजार रु. फोन-पे वरून हस्तांतरीत करून १लाख एक हजार रु. ला गंडा घालुन बलात्काराची धमकी देत लुबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाच्या फिर्यादी वरून ती महिला आणि तिचे पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज येथील एका कॉलनीत राहणाऱ्या परिक्तता महिलेने तिला अंबाजोगाई येथे दवाखान्यात नातेवाईकाला भेटण्यासाठी म्हणून गॅरेज मालक सुग्रीव बसवर यांची स्विफ्ट डिझायर कार क्र. (एम एच १२/के एन ०६७९) ही भाड्याने केली. तो तिला घेऊन रात्री ९:०० च्या सुमारास घेऊन अंबाजोगाईकडे जाण्यासाठी निघाला. मात्र ती महिला अंबाजोगाईत जात असताना केज-चंदनसावरगाव-होळ- लोखंडी सावरगाव या मार्गे न जाता धारूर मार्गे निघाले. त्यांची कार धारूर येथील आंबेडकर चौकात गेल्या त्या महिलेने नंतर पाहुणा येणार असल्याचे सांगितले. तेथे थोडा वेळ थांबून तिने अस्वला-आडस मार्गे अंबाजोगाईकडे जाण्याचे सांगितले आणि ती महिला पुढे येऊन चालकाच्या शेजारच्या सिटवर बसली. ती तिच्या मोबाईलवरून कोणाशी तरी चॅटिंग करीत होती. गाडी धारूरहुन पुढे तीन ते चार कि.मी. अंतरावर गेली रस्ता खराब असल्याने त्यांची कार मंद गतीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अनोळखी पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना ओव्हरटेक करून गाडी पुढे आडवी उभी करून त्यांना अडविले. त्या अनोळखी गाडीतुन चौघेजण खाली उतरून एकाने सुग्रीवच्या गाडीच्या खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. त्याने सुग्रीव बसवर याला ओढून बाहेर गाडी काढले व मारहाण करीत त्याला अनोळखी दुसऱ्या गाडीत बसविले आणि त्या महिलेला सुग्रीवच्या गाडीतच बसविले. नंतर त्याला घेऊन ते एका अनोळखी गाडीने व त्याची गाडी असे दोन गाड्या आडस पासून पुढे एका निर्जनस्थळी थांबले. रात्री सुमारे १२:०० वा. सुमारास त्यांनी त्याला त्याच्या खात्यावरील ११ हजार रु. हे त्या तरुणीच्या बँक खात्यावर हस्तांतरीत करायला लावले. तसेच त्याला आणखी ५० हजार रु. त्याच्या गाडी मालकाला अपघात झाल्याचे खोटे सांगून हस्तांतरीत करायला सांगत होते. सुग्रीव याने गाडी मालक राजन डोंबे याच्याशी संपर्क साधून पैसे पाठविण्याचे सांगितले. परंतु गाडी मालक राजन डोंबे हा त्याला तुझे लोकेशन शेअर कर असे म्हणताच त्याला लोकेशन पाठवू नको असे म्हणाले. त्या नंतर राजन डोंबे याने बनकरंजा येथील दुर्गादास लांब यांना कॉन्फरन्सवर घेऊन माहिती सांगितली. तेव्हा दुर्गादास लांब त्याला म्हणाले एवढी रक्कम माझ्या कडे नगदी स्वरूपात नाही. नंतर त्या अनोळखी लोकांनी पुन्हा सुग्रीव बसवर याला त्याच्या गाडीत बसविले व त्या महिलेच्या खांद्यावर हात टाकायला लावून फोटो काढले आणि तू इथून निघून जा; अन्यथा तुझ्यावर बलात्काराची ,खोटी केस करू अशी धमकी दिली. या गडबडीत त्या अनोळखी व्यक्ती पैकी एकाच्या तोंडावरील मास्क गळून खाली पडला. तेव्हा सुग्रीव बसवर याने तो इसम हा त्या महिलेच्या मामाचा मुलगा अशोक मिसाळ (मुंडे) हा असल्याचे ओळखले. बाकी इतर ५ लोकांनी रुमालाने त्यांचे चेहरे झाकलेले होते त्यांच्या अंगात काळे जॅकेट आणि जीन्स पॅन्ट होत्या. त्यांनी निघून जाताना सुग्रीव बसवर याचा मोबाईल सुद्धा घेऊन गेले.
नंतर सुग्रीव बसवर याने त्याची कार आडसहून चंदनसावरगाव रस्त्याला घेऊन आला. तो गाडीत बसलेल्या त्या महिलेस म्हणाला की, त्या लोकांनी त्याच्या मोबाईलवरून तिच्या खात्यावर ११ हजार रु फोन-पे द्वारे हस्तांतरीत केले आहेत. तसेच गाडीच्या डिग्गीतील नगदी ९० हजार रु घेऊन गेले. तेव्हा ती महिला म्हणाली की तिच्याकडे फोन-पे नाही. उलट तिचेच एटीएम कार्ड घेऊन गेले असल्याचे तिने सांगितले. यर पहाटे ३:३० वा सुग्रीव याने कार मालक राजन यास गाडीत इंधन नसल्याने ५०० रु. हस्तांतरीत करण्यासाठी त्या महिलेच्या फोनवरून सांगितले. तर राजन याने त्यास हळू हळू पुढे ये म्हणून सांगितले. सुग्रीव त्या महिलेला म्हणाला की, मारहाण करणाऱ्या पैकी एकाला त्याने ओळखले असून तो तिच्याच मामाचा मुलगा अशोक मिसाळ (मुंडे) हा आहे. तेव्हा त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार कर. असे म्हणताच; ती महिला त्याला म्हणाली की, तिला गुपचूप घरी नेउन सोड. अन्यथा बलात्कार केल्याची खोटी फिर्याद पोलिसांत करीन आणि आयुष्यभर कारागृहात टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, गाडी मालक राजन डोंबे, दुर्गादास लांब हे त्याच्याजवळ आले होते. त्यांनी ही माहिती युसुफवडगाव पोलीस स्टेशनला येथे जाऊन दिली. परंतु ही घटना केज पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने त्यांनी केज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याचे सांगितले.त्या नुसार सुग्रीव बसवर याच्या फिर्यादी वरून ती महिला, तिच्या मामाचा मुलगा अशोक मिसाळ (मुंडे) रा. कोल्हेवाडी व इतर पाच अनोळखी यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०२/२०२२ भा.दं.वि. ३८५, ३८८, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे करीत आहेत.