केज दि.११ – येथील तालुका कृषी कार्यालयाने कार्यालयीन कागदपत्रांच्या वर्षेभर उधारीवर झेरॉक्स काढून घेतल्या. झेरॉक्सचे कार्यालयाकडे ८७ हजार ९१२ रुपयांचे बिल थकले आहे. परिणामी, झेरॉक्स सेंटर चालकाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून दुकानाचा किराया थकला आहे. त्यामुळे २६ जानेवारीपूर्वी हे बिल अदा करण्यात यावे अन्यथा ध्वजारोहण दिवशी तालुका कृषी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दुकानदाराने दिला आहे.
केज येथील तालुका कृषी कार्यालयाच्या कॉम्प्लेक्समध्ये आकाश विकास मोहिते हे स्वप्नील मल्टी सर्व्हिसेस व झेरॉक्स सेंटर चालवीत असून त्यांचे दुकान भाड्याने आहे. त्यांच्या सेंटरमधून कृषी कार्यालयातील कार्यालयीन कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून घेतल्या जातात. १६ मार्च २०२० ते १६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत कृषी कार्यालयाने उधारीवर वेळोवेळी झेरॉक्स काढून घेतल्या. मात्र झेरॉक्स प्रतीचे बिल देण्यास टाळाटाळ केल्याने मोहिते यांचे कृषी कार्यालयाकडे ८७ हजार ९१२ रुपयांचे बिल थकले आहे. वेळोवेळी बिलाची मागणी करून ही तालुका कृषी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे झेरॉक्स बिलासाठी निधीची मागणी केली असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे झेरॉक्स सेंटरवरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर हे बिल मिळण्यास विलंब होत गेल्याने या झेरॉक्स दुकानाचे भाडे ही थकले आहे. त्यात उसनवारी करून त्यांनी कागदाच्या रिम आणून कृषी कार्यालयास झेरॉक्स पुरविल्या.
दरम्यान, अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने शेवटी टोकाची भूमिका घेतली असून २६ जानेवारीपूर्वी हे बिल अदा करण्यात यावे अन्यथा ध्वजारोहण दिवशी तालुका कृषी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा आकाश विकास मोहिते यांनी जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.