केज दि.१० – पुण्यात प्लॉट घेण्यासाठी व लग्नातील कर्ज फेडण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २२ वर्षीय विवाहितेस मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बीड शहरातील बालेपीर भागातील जावेद जाफर पठाण याच्याशी सानिया या २२ वर्षीय महिलेचा निकाह झाला होता. लग्नानंतर पती जावेद पठाण, सासरा जाफर पठाण, सासू मेहरूनिसा पठाण, नणंद झीनत पठाण, मामे हमीद शेख यांनी संगनमत करून पुण्यात प्लॉट घेण्यासाठी व लग्नातील कर्ज फेडण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी सानिया पठाण हिला तगादा लावला. तिने माहेरहून तेवढी रक्कम आणण्यासाठी नकार दिल्याने तिला लाथाबुक्क्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी देत तिचा शारीरीक व मानसिक छळ केला.
दरम्यान सानिया पठाण हिने दिलेल्या फिर्यादीवरून पती जावेद पठाण, सासरा जाफर पठाण, सासू मेहरूनिसा पठाण, नणंद झीनत पठाण, मामे हमीद शेख या सहा जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.