बीड दि.१३ – मागील आठवड्यापासून औरंगाबादेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच होती. मात्र बुधवारी रुग्णसंख्येचा विस्फोट पहायला मिळाला. मागील 24 तासात शहरात तब्बल 410 रुग्ण आढळून आले. शहरातील दर 100 रुग्णांमागे 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. औरंगाबादप्रमाणेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमधील कोरोना रुग्णांची आकडेवारीदेखील 400 च्या घरात पोहोचली आहे.
तर नांदेडमध्ये बुधवारी 474 नवे कोरोनाबाधित आढळले. यात मनपा हद्दीत 346 रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल 23 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र बाधितांना सौम्य लक्षणे जाणवत असून रुग्णालयात भरती करण्याचे प्रमाण कमी आहे. लातूर जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला. बुधवारी येथील रुग्णांचा आकडा 434 एवढा नोंदला गेला. येथील पॉझिटिव्हिटी रेटही 15.6 वर पोहोचला आहे. जालना जिल्ह्यात बुधवारी 97 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
परभणी जिल्ह्यात बुधवारी 73 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. येथील पॉझिटिव्हिटी रेट 2.33 असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी 22 रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात 38 कोरोना रुग्णांची नोंद झाली.
राज्याप्रमाणे मराठवाड्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक असली तरीही रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ही बाब सकारात्मक आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या नगण्या असून घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा तुलनेने जास्त आहे. रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता मोठ्या प्रमाणात केली असली तरी शिल्लक बेडच जास्त असल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचे बदल दिसून येत आहे. मध्येच कडाक्याची थंडी तर कधी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी गारपीट होतेय. मराठवाड्यात थंडगार वाऱ्याचाही सामनाही नागरिकांना करावा लागतोय. अनेक भागात कित्येक दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अशा वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत असून घरोघरी सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण आढळत आहेत.