केज दि.१८ – पोलिसांनी पहाटेच्या गस्ती दरम्यान दरोडेखोरांची टोळी मोठ्या शिताफीने पकडली. शहरालगतच्या कळंब रोडवरील विठाईपुरम समोर आज मंगळवारी (दि. १८) पहाटे साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दरोडेखोरांकडून एका कारसह धारदार हत्यार, लोखंडी पहार तसेच तोंडावर बांधावयाचे काळे कपडे जप्त केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे दरोड्याची मोठा अनर्थ टळला.
केज पोलिस मध्यरात्री कळंब रोडवर रात्रीच्या गस्तीवर होते. या ठिकाणी पोलिसांना पुलावर अंधारात एक कार (क्र.एम.एच.०५ ए.एस. ९५८५) आढळून आली. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केली असता कारबाहेर उभे असणारे दोघेजण पळू लागले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पाठलाग करत त्या दोघांना पकडले. शिवाय अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी कारमधील तिघांना जागीच ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी करत नाव गाव विचारले असता सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी स्वतःचे खरे नाव सांगितले. ही टोळी केज परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीने निघाली होती. शिवाय लोकांनी विरोध केलाच तर धारदार हत्याराने मारहाण करून ऐवज लंपास करायच्या उद्देशाने हे दरोडेखोर आल्याचे निष्पन्न झाले. कैलास सखाराम पवार (२८), परमेश्वर सखाराम पवार (२०, दोघे रा. लिबा ता. पाथरी जि. परभणी), संतोष कोंडीराम सोनटक्के (२५), राहुल बालासाहेब कांबळे, (२३, दोघे रा.गुंज (खु.) ता. पाथरी जि. परभणी आणि सुशिल मारोती चव्हाण (२०, रा. पिट बाभळगाव ता. पाथरी जि. परभणी) यांचा आरोपीत समावेश असल्याची माहिती केज पोलिसांनी दिली.
दरम्यान, संबंधित पाचही दरोडेखोरांवर पो. ना. दिलीप गित्ते यांच्या फिर्यादीवरून केज ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९९ सह ४/२५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.