नवी दिल्ली दि.१९ – कोरोना महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं चिंतेत भर पाडली आहे. कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे. राज्यातील आकडेवारी तर धडकी भरवणारी आहे. सगळकीडे थैमान घालणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. कोरोना कधी संपणार यावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. मायकेल रायन यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
आपण या विषाणूला आता नष्ट करू शकणार नाही. कारण हा विषाणू आपल्या परिसंस्थेचा भाग बनला आहे. परंतू आपण कोरोनामुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपवू शकतो, असं वक्तव्य डॉ. मायकेल रायन यांनी केलं आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी जगातील सर्व लोकसंख्येला लसीकरण झालं पाहिजे. तरच कोरोना महामारी संपविण्यास मदत मिळेल, असंं मत रायन यांनी व्यक्त केलं आहे.