केज दि.३० – बांधकामावरील मजूर सोडून येतो अशी थाप मारून एकाने दुचाकी चोरून नेल्याची घटना केज – बीड रस्त्यावरील डोणगाव फाट्यावर घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील डोणगाव येथील श्रीराम प्रभू घुले यांचे उमरी फाट्यावरील साखर कारखान्यासमोर बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील मजुरास उमरी गावात सोडून येतो अशी थाप मारून नारायण बळीराम लहाने ( रा. अयोध्या नगर, बहिरवाडी रोड, बीड ) याने श्रीराम घुले यांची १५ हजार रुपये किंमतीची जुनी दुचाकी ( एम. एच. ४४ व्ही. ४०३९ ) १० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेली. त्याने परत आणून न देता दुचाकी चोरून नेल्याची फिर्याद श्रीराम घुले यांनी दिल्यावरून नारायण लहाने याच्याविरुद्ध केज पोलिसात २९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक बाळू सोनवणे पुढील तपास करत आहेत.