औरंगाबाद : औरंगाबादेत झालेल्या सख्ख्या बहीण-भावाच्या हत्येचा काही तासातच उलगडा झाला आहे. चुलत भाऊ आणि त्याच्या मेव्हण्याने या दोघांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या उद्देशाने त्यांनी दोघा भावंडांना संपवल्याचा आरोप आहे.
बहीण किरण खंदाडे आणि भाऊ सौरभ खंदाडे यांची हत्या झाली होती. औरंगाबादेतील सातारा भागात परवा (मंगळवार 9 जून) हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला होता. राहत्या घरातील बाथरुममध्ये सख्ख्या बहीण-भावाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती. त्यातच नातेवाईकांनी दोघांची हत्या केल्याचं समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.खंदाडे कुटुंब एमआयटीसमोर अल्फाईन हॉस्पिटलच्या मागे एका दुमजली बंगल्यात राहते. भावंडांचे वडील लालचंद खंदाडे पत्नी आणि मोठ्या मुलीसह शेतीच्या कामासाठी जालन्याला गेले होते. मंगळवार रात्री आठ वाजता ते घरी आल्यावर हत्येचा प्रकार उघडकीस आला.
दुपारीच हे हत्याकांड घडल्याचा अंदाज
हत्येनंतर घरातून दीड किलो सोनं गायब झाल्याने चोरीचा संशय आधीपासूनच व्यक्त केला जात होताच. घरातली साडेसहा हजाराची रोकडही लंपास करण्यात आली होती. दरवाजे-खिडक्या सुस्थितीत असल्याने, तसेच टेबलवर चहाचे चार कप आढळल्याने ओळखीच्या व्यक्तीने हत्या केल्याचा अंदाज पोलिसांना होता.मयत किरण पुण्यातील कॉलेजमध्ये शिकत होती, मात्र लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद असल्याने ती घरी परतली होती, तर तिचा भाऊ औरंगाबादेतच शाळेत होता.
आईवडील गावी गेल्यामुळे मंगळवारी रात्री घरात बहीण भाऊ दोघेच होते. ही संधी साधून त्यांचा चुलतभाऊ आणि त्याच्या बहिणीचा नवरा घरात आले. चोरीच्या उद्देशाने दोघांनी बहीण-भावाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. चुलत भावाला औरंगाबाद क्राईम पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.